पाणी टंचाई आणि टँकरग्रस्ततेचा शाप?   

समस्याग्रस्त : पुणे : सुरेश कोडितकर 

पुणे शहराला पानशेत, वरसगाव, टेमघर, खडकवासला या धरणांव्दारे पाणी पुरवठा होतो. पूर्वी लोकसंख्या कमी होती. पाऊसमान समाधानकारक होते. ही परिस्थिती वेगाने बदलली. पुणे शहरात शिक्षण, नोकरी यासाठी येणार्‍यांची आणि स्थलांतर करणार्‍यांची लोकसंख्या निरंतर वाढत गेली. आजही यात खंड पडलेला नाही. शहर आणि ग्रामीण भागातील नागरीकरणही सातत्याने वाढत गेले आहे. पण पाऊसमान कमी जास्त झाले आहे. धरणाचा जो पुस्तकी पाणीसाठा आहे तो कागदावर आजही तोच आहे. उलट धरणात वर्षानुवर्षे गाळ जमा होऊन धरणाची पाणी साठवण करण्याची क्षमता कमी झालेली आहे. परिणामी आता पुणे शहरात, परिघावर आणि ग्रामीण भागात पाणी टंचाई सातत्याने जाणवत आहे. पुरेसा पाऊस होणे, पाणी साठा होणे आणि पाणी टंचाईचे रडगाणे वर्षभर चालणे हे आता नित्याचे झाले आहे. पाण्याचे वरदान लाभलेले पुणे आता पाणी टंचाई शापग्रस्त झालेले आहे असे समजण्यासारखी परिस्थिती आहे.
 
पुणे शहराला १६.३६ टीएमसी पाणी कोटा मंजूर आहे. प्रत्यक्षात पुणे शहर नेमून दिलेल्या पाणी मंजुरीपेक्षा अधिक पाणी उचलते. पुणे शहरातील वितरण व्यवस्थांमध्ये सुमारे ४० % पाणी गळती असल्याने शुध्द पाणी शेवटच्या वापरकर्त्यापर्यंत पोहचत नाही. परिणामी शुध्द केलेल्या १०० % पाण्यातून महसूल प्राप्ती होत नाही आणि शेवटच्या टोकाला पाणी न पोहोचल्यामुळे तेथील नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागते. टँकरचे आगमन होते ते असे. पाणी पुरवठा यंत्रणेचे मोठे अपयश म्हणजे त्यांना ना जुन्या वितरण व्यवस्थांची संपूर्ण माहीती आहे, ना त्यांनी वितरण व्यवस्थेचे नवीन जाळे अभ्यासपूर्वक तयार केले आहे. त्यामुळे वितरण व्यवस्थेची चाळणी होऊन उचित दाब नाहीसा झाला आहे आणि पाण्याचे परिमाण घटले आहे. पुण्याचा परीघ विस्तारत असताना पाण्याची सोय होईल या आशेवर स्थानिक लोक उप नगरात सन २०१० मध्ये कर्ज प्रकरण करून वा निवृतीची राशी गुंतवणूक करत गेले. त्यामुळे धनकवडी, कात्रज, हडपसर, चंदननगर, टिंगरे नगर, औंध, कर्वे रस्ता, पानमळा, वडगाव ही उपनगरे वाढत गेली. त्यावेळी पुण्याकडे मर्यादित उपलब्ध असलेले पाणी भविष्यात पुरणार नाही हा विचार त्यावेळी कोणाच्याही मनाला शिवला नाही. आता मूळ पुणेकर पाण्याच्या सुकाळातून दुष्काळात पोहोचण्याच्या मार्गावर उभा आहे.

कुचकामी यंत्रणा

पुणे शहरात आता २४ तास पाणी पुरवठ्याचे मृगजळ धावत आहे. त्यासाठी नवीन जल वाहिन्या अंथरल्या जात आहेत. नवीन साठवण टाक्या उभारण्यात येत आहेत. पण या जल वाहिन्या आणि साठवण टाक्या यात साठवण्या इतपत शुद्ध जल नव्याने कुठून आणणार याचे उत्तर कोण देणार ? याआधी जेवढे अशुद्ध पाणी खडकवासला प्रकल्पातून उचलण्यात येत होते, त्यात बदल झालेला नाही. मग २४ द ७ साठी वाढीव पाणी परिमाण अर्थात साठा कुठून निर्माण केला जाणार आहे ? मृगजळ आहे ते या अर्थाने. पुण्यात पूर्वापार जो पाणी कोटा मंजूर आहे त्यापेक्षा जास्त पाणी उचलले जात आहे.  कारण ४० टक्के पाणी गळत्यांव्दारे वाया जात आहे. त्यामुळे वाढीव पाणी उचलसाठी दंडासहीत वाढीव पाणी पट्टी भरली जात आहे. ती सुद्धा पुणेकरांच्या करातून. २४ द ७ राबवायचे ते सुद्धा पुणेकरांच्या करातून. पुन्हा टँकरसाठी पैसा जाणार तो ही पुणेकरांचाच. 

टंचाई, टँकर, लूट  

बाणेर, बालेवाडी, धायरी, आंबेगाव, नन्हे, कात्रज, बिबवेवाडी, महंमदवाडी, एनआयबीएम, उंडी, पिसोळी, मांगडेवाडी, येरवडा, कोथरूड, कर्वेनगर, वारजे, बावधन, पाषाण, औंध, शिवाजीनगर, सेनापती बापट रस्त्याची दोन्ही बाजू, डेक्कन जिमखाना, बोपोडी, वडगाव शेरी, टिंगरेनगर, कोंढवा, कात्रज, सिंहगड रस्ता परिसर, मध्यवर्ती पेठा याठिकाणी टंचाई जाणवते आहे. लोकांनी टँकर मागवणे भाग पडत आहे. अघोषित पाणीकपात एकीकडे पुण्यात पाणीकपात केली जाणार नाही, असे सांगितले जात असले तरी अघोषित पाणीकपात केली जात आहे. धरणात मुबलक पाणी उपलब्ध आहे, पाणी पुरवठा यंत्रणा सुरळीत काम करत आहे,  असे उच्चरवाणे सांगितले जात असले तरी ग्राउंड झिरोवरील परिस्थिती वेगळी आहे. अनेक सोसायट्या तहानलेल्या आहेत.  नागरिक त्रस्त पाणी गोळा करता करता त्रस्त झालेले आहेत. प्रत्यक्ष जमिनीवरील जलयातना या जनतेला भोगाव्या लागत आहेत. 

टँकरच्या गणिताचे गौडबंगाल  

पाणी टंचाईच्या काळात महापालिकेकडून मोफत टँकर पुरवले जातात. पण मागणी आणि पुरवठा हे गणित जुळत नाही. महापालिकेच्या मालकीचे २० टँकर आहेत. ते कुठवर पुरणार ? नागरिकांकडून महापालिकेकडे टँकरची मागणी केल्यानंतर त्यांना बराच वेळ वाट पाहिल्यानंतर एखादा टैंकर मिळतो. यंदाच्या मार्च महिन्यात मोफत टँकरची मागणी नऊ हजारने वाढली होती. महापालिकेने सुमारे ४० कोटी रुपयांच्या निविदा काढून वर्षभरासाठी टँकर पुरवठादार नेमले आहेत. त्यांच्या टँकरची संख्या २५० आहे. प्रत्येक टँकरच्या दररोज सरासरी पाच फेर्‍या होतात. परंतु हे मोफत पाणी पुरसे नसल्याने प्रति टँकर काही हजार रुपये मोजून खासगी टँकरचालकांकडून पाणी विकत घ्यावे लागते. अशा प्रकारे पाणी प्राप्त करण्याला पर्याय नाही हे आजचे भीषण वास्तव आहे. पुण्यावर महानगरीकरण लादले गेले हे आपण जाणतो. पण त्याची फार मोठी किंमत हे मूळ पुणेकरांना चुकवावी लागत आहे. पुणे विस्तारले आणि पुणे फुगले असे आपण म्हणत असलो तरी पुणे पाणी टंचाईने त्रासलेले आणि तहानलेले आहे असे आता कायम म्हणायची वेळ आली आहे. महापालिका मोफत टँकर उपलब्ध करून देत असेल तर त्याचे व्यवस्थित नियोजन करणे हे कोणी पाहायचे ? असे मोफत टँकर प्राप्त करण्यासाठी मागणी कुठे नोंदवायची, टँकर कुठून भरले जातात, वाटप कसे केले जाते, कोणाला संपर्क करायचा याबाबत स्पष्टता नको का ? पाणी टंचाई जर डोळ्यातून पाणी काढत असेल तर हे महानगरीकरण काय कामाचे ?

अघोषित पाणीबाणी, हात ओले  

पुण्याला आता कायमचा पाणी टंचाईचा शाप असे आपण म्हणतोय कारण, टँकरमाफिया यांनी उपनगरात आणि विस्तारित पुण्यात पाणी पुरवठा यंत्रणेवर कब्जा स्थापित केला आहे. संपूर्ण नगर रस्ता, खराडी, विमाननगर या   भागांना भामा आसखेड धरणातून पाणीपुरवठा होतो. तथापि येथील पाणी पुरवठा यंत्रणेवर संगनमताने अनियमितता केली जात आहे. कमी पाणी देणे, पाणी पुरवठ्याच्या झडपा मनमानी पद्धतीने हाताळणे, अनैतिक मार्गाने जास्त वेळ पाणी सोडणे, विषम आणि असमान वाटप करण्याच्या दबावाला बळी पडणे, भ्रष्ट मार्गाचा अवलंब करणे हे सगळे सातत्याने घडत आहे. नागरिकांची अवस्था मुकी बिचारी कुणी हाका अशी झाली आहे. 
 
पुणे महानगरात शुध्द पाणी टँकरची हजारो उड्डाणे पाहायला मिळत आहेत. कोटी कोटी रुपये पाण्यासारखे पिण्याच्या पाण्यात वाहत आहेत. पाणी गळते, पैसा मुरतो आणि टँकरलॉबी गब्बर होते. जलशुद्धीकरण केंद्र, टँकर, पुरवठा यंत्रणा हे त्रिकुट खरंतर पुण्य संचयाचे धनी व्हायला हवे होते. कारण पाणी पाजण्यासारखे पुण्य नाही. पण हे त्रिकुट पुण्यसंचय करण्यात कमनशिबी ठरले आहे. मार्च महिन्यात पर्वती येथून १३३८ टँकर, धायरी येथून २४१३ टँकर, पद्मावती येथून १२९२४, पटवर्धन बाग ७६३ टँकर, चतु:शृंगी ७७३८ टँकर, राम टेकडी १५७२४ टँकर आणि वडगाव शेरी येथून ६५११ टँकर अशी मागणी झालेली आहे. नर्‍हे, किरकटवाडी, पिसोळी, महंमद वाडी, बाणेर, लोहगाव, शिवाजी नगर, वाघोली, उंड्री, पिसोळी, बालेवाडी, धानोरी वगैरे वगैरे. पुणे महानगराच्या अमुक तमुक भागात टँकर आवश्यक नाही आणि पुण्यात पाणीबाणी नाही, असे म्हणण्याचे धारिष्ट्य कोणी दाखवणार नाही. ना शासन. ना प्रशासन. पुणे टँकरग्रस्त आणि टंचाई हा शाप आता कायम राखणार आहे. मूळ पुणेकरांचा कसूर काय असे विचारणे व्यर्थ आहे. कारण पुण्यात स्थलांतर थांबणार नाही. पिण्याच्या पाण्याची मागणी वाढणार. पाणी साठवण कमी होत जाणार. शेतीसाठी पाणी द्यावे लागणार. मग धरणातील पाणी पुरणार कसे?
 

Related Articles